Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

विद्यार्थ्यांचा शेतीकडे वाढता कल

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणाऱ्या ९.४६ टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस असून त्यांना 'कृषितज्ज्ञ' व्हायचे आहे. तर, ७.३० टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जाण्याची आणि ७.२५ टक्के विद्यार्थ्यांना पोलिस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण व कल लक्षात घेत, त्यांना त्यांच्या करिअरची दिशा ठरविता यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन व समुपदेशन सत्रा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने ही आकडेवारी पुढे आली आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी 'करिअर'च्या दृष्टीने दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे? या अनुषंगाने त्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित समुपदेशन व सुयोग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने गेल्यावर्षीपासून मनपा शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. 'अंतरंग फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमादरम्यान गेल्यावर्षी नववीत शिकणाऱ्या सुमारे साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असल्याचे, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सोमवार ते शुक्रवार, असे सलग पाच दिवस दररोज तीन तास तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी गटनिहाय संवाद साधतात. साधारणपणे प्रत्येक गटात सुमारे ४० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यापैकी पहिल्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण व त्यांचा कल शास्त्रीय पद्धतीने अभ्यासला जातो.

दुसऱ्या टप्प्यांतर्गत एक विशेष समुपदेशन सत्र घेतले जाते. शेवटचा आणि तिसरा टप्पा हा संबंधित विद्यार्थी दहावीत गेल्यानंतर घेतला जातो. या अंतर्गत दहावीच्या पहिल्या सहा महिन्यांत एक उजळणी सत्र व दहावीच्या अंतिम परीक्षेपूर्वी दुसरे उजळणी सत्र घेतले जाते. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या 'करिअर'विषयक कलाबाबत काही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेऊन त्या आधारे विद्यार्थ्याचे पुन्हा एकदा समुपदेशन केले जाते.Source: https://maharashtratimes.indiatimes.com

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com