Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

मराठवाड्यातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे कोरडवाहू फळबागांवर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या येथील हिमायत बाग फळ संशोधन केंद्र, पुढील काळात कोरडवाहू फळबागांवर भर दिला जावा, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे मराठवाड्यातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. केंद्रात हजारो रोपांची निर्मिती करण्यात आली आहे आणि ती जून महिन्यात शेतकऱ्यांना दिली जातील.

अपवाद वगळता गेल्या काही वर्षापासून कमी पाऊस झाला. त्यामुळे या फळबागांना पाणी देण्यात अडचणी निर्माण झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेत फळबागा जगविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. पण, अनेकांना त्यात यश आले नाही. मराठवाड्यात मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागांचे अधिक क्षेत्र आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवर फळबागा जळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले.

मराठवाड्यातील हवामान आणि पाणी टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाने कोरडवाहू फळबागांवर भर दिला आहे. या फळबागांना पावसाचे पाणी पुरेसे असते. इतर खर्च जास्त नसल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या फळबागा आधार ठरणार आहेत.शिवाय यात दरवर्षी निश्चित उत्पन्न असल्यामुळे कृषीतज्ज्ञांनी कोरडवाहू फळबागांची शिफारस केली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातील रोपवाटिकेत केंद्र प्रभारी डॉ. एम.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोप निर्मितीचे काम सुरू आहे. चिंच, आंबा, सीताफळ, कवठ, रामफळ या फळांची रोप निर्मिती करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोप, पाऊस पडल्यानंतर जून, जुलै महिन्यांत उपलब्ध करुन देण्यात येतील. याच बरोबर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोरडवाहू फळबाग लागवडीवर भर द्यावा, यासाठी त्यांना माफक दरात रोपे दिली जाणार आहेत.

Source: http://maharashtratimes.indiatimes.com

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com