Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

महाराष्ट्रातील ज्वारीची पेरणी व खत पद्धती

भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

या पिकाला साधारणतः २७°ते ३२°से. तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८°ते ४४°से. तापमानातही वाढू शकतात. ज्वारीचे पीक मिश्र पीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडई बरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथा बरोबर मिश्र पीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारी बरोबर गवार अगर अंबाडीचे ही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्र पीक घेतात.

या पिकाकरिता जमीन दरवर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. पावसाळी हंगामातील जाती जून-जुलै मध्ये पेरतात. वार्षिक ७५ ते ८२ सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात.

निरनिराळ्या प्रयोगांवरून असे आढळून आले आहे की, हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. पेक्षा जास्त नायट्रोजन आणि २०–३० किग्रॅ. पेक्षा फॉस्फोरिक अम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारांच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमाणात वाढ होत नाही. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते.

निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरित प्रकारांसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगान्ती ठरविण्यात आल्या आहेत. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com