Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

देखणेपणामुळे पंजाबी संत्रीची निर्यात वाढली

अस्सल चवीपेक्षा देखणेपणात मात करणारा ठरल्याने पंजाबच्या देखण्या संत्रींच्या तुलनेत नागपुरी चवदार संत्री निर्यातीत माघारली आहेत. श्रीलंका, बांगलादेश, रशिया व काही आखाती देशांत गत दोन वर्षांपासून नागपुरी संत्रा म्हणून ओळख असणाऱ्या विदर्भातील संत्री निर्यातीस प्राधान्य असे, पण यंदा पंजाबची संत्री पुढे गेली. त्याचे मुख्य कारण, भाव कमी व संत्र्यांच्या देखणेपणाला दिले जात आहे.

पंजाबचा नारिंगी, चमकदार व आकाराने एकसमान घट्ट बांधणीची गरगरीत संत्री प्रथमदर्शनी लक्ष वेधून घेतात. त्या तुलनेत नागपुरी संत्री भरपूर रसरशीत असतात, पण आकाराने ओबडधोबड, उदास रंगाची, आकाराने असमान असल्याने ही संत्री मात्र बाजारात लक्षवेधी ठरत नाही.

नागपुरी संत्रीला निर्यातीत मागे खेचणारी दुसरी बाब म्हणजे, बाजारभाव होय. पंजाबची संत्री ७ रुपये किलो दराने निर्यातदारांना उपलब्ध होतात, तर नागपुरी संत्रींचा भाव १८ ते २५ रुपये किलो आहे. भावातील हा फरक बाजारपेठेतील उठाव निर्धारित करतो. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने यंदा देशाबाहेर नागपुरी संत्री पोहोचली नाहीत.

सरासरी रोज दीडशे टन संत्रीच बांगलादेशला निर्यात झाली, अशी माहिती संत्री उत्पादक संघटनेचे नेते श्रीधर ठाकरे यांनी दिली. भरपूर उत्पादनामुळे भाव कमी व दिसायला आकर्षक पंजाबी संत्रीलाच देशाबाहेर मागणी झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उत्पादनातील विसंगती ही बाब स्पष्ट करते. पंजाबात ६० हजार हेक्टरवर संत्री लागवड होते. नागपुरी संत्रीचे लागवड क्षेत्र दीड लाख हेक्टरचे आहे.

ही संत्री कारंजा, वरूड, मोर्शी, नागपूर याच भागांत असून मध्य प्रदेशातील पांढुर्णा, सौंसर येथील संत्रीसुद्धा नागपुरी संत्री म्हणूनच ओळखली जातात, पण या संत्रींची हेक्टरी उत्पादन क्षमता कमी आहे. आपली संत्री हेक्टरी ८ टन, तर पंजाबी संत्री हेक्टर २२ टन, अशी उत्पादन क्षमता आहे. त्यामुळे त्यांना ७ रुपये किलोचा भाव निर्यातीसाठी परवडतो.

पंजाबातील संत्री उत्पादकांनी संघटना स्थापन करून शीतगृहे, कलम लागवड, पॅकेजिंग अशा सामूहिक सुविधा निर्माण करून घेतल्या. दहा हजार संत्री उत्पादकांची ही संघटना कलमांची विक्री, लावणी, देखभाल या बाबी हाताळते. रोगांवर नियंत्रण ठेवणारी प्रभावी यंत्रणा त्यांनी निर्माण केली आहे. आपल्याकडे या सर्व बाबींची वानवा आहे, असे निदर्शनास आणले जाते.

पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे जगभर जातात, कारण लागवड व बाजारपेठेबाबत योग्य मार्गदर्शन त्यांना मिळाले. नागपुरी संत्री गत दोन वर्षांपासून सरकारच्या ‘रडार’वर आली. त्यामुळेच गतवर्षी कारंजा निर्यात केंद्रातून पहिली खेप देशाबाहेर गेली. आता मोर्शी येथील संत्री प्रकल्प कार्यान्वित होत आहे. चांगल्या कलमा व शेतातच मातीपरीक्षण शाळा झाल्यावर उत्पादन क्षमतेत पुढील काळात फ रक दिसून येईल, असे ठाकरे म्हणाले.

Source:http://www.loksatta.com

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com