Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

यंदा कापूस लागवडीत दुपटीने वाढ

रुंदेशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत जून महिन्यात पावसाच्या चांगल्या उपस्थितीमुळे कापूस लागवडीने चांगला वेग पकडला आहे. या वर्षी ३० जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यामध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रात अनुक्रमे ६.५ लाख हेक्टर व ३.१६ लाख हेक्टर इतकी वाढ नोंदविण्यात आली असल्याचे दिसले. देशात गेल्या वर्षी याच कालावधीत १९ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली होती आणि या वर्षी ३० जूनपर्यंत एकूण ४६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली.

उत्तर भारतात यंदा १५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा अंदाज आहे. तिथे कापसाची तुलनेने लवकर लागवड केली जाते. सध्या पंजाब, हरियाना, राजस्थान ही राज्ये आघाडीवर आहेत. उत्तर भारतात पंजाब मध्ये ३.८० लाख हेक्टर, हरियाना मध्ये ६.०६ लाख हेक्टर, व राजस्थान मध्ये १.४० लाख हेक्टर लागवड झाली आहे.

पंजाबमध्ये तर कापसाकडे शेतकऱ्यांचा ओढा प्रचंड वाढल्यामुळे तिथल्या कृषी विभागाने मक्याची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. गुजरातमध्येही यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य, गवार यांच्या तुलनेत कापूस व भुईमुगाला जास्त पसंती दिल्यामुळे कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी देशभरात कडधान्य पिकांचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आणि इतर सर्व पिकांच्या तुलनेत कापसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती याच कारणामुळे यंदा कापसाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे.

देशात कापसापाठोपाठ कडधान्य पिकांची लागवड ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी कडधान्य लागवडीखालील क्षेत्र १३.०४ लाख हेक्टर होते, यावर्षी ३० जूनपर्यंत ते १८.८ लाख हेक्टर पर्यंत गेले आहे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com