Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

पाथर्डी येथे कृषि प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात आली

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे संपूर्ण महाराष्ट्राकरीता कृषी प्रकिया विभागाशी संबंधीत नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन तसेच शेतकी, महिला व ग्रामिण तरूण यांना गरजेनुसार कृषि प्रक्रिया तंत्रज्ञान पुरवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र उपलब्ध आहे. पोस्ट हार्वेस्ट प्रक्रिया तंत्रज्ञान विकसीत करण्यासोबतच सदर तंत्रज्ञान गरजु व्यक्तीकडून आत्मसात करण्याकरीता सुद्धा या केंद्रामार्फत विशेष प्रयत्न केले जातात.

पोस्ट हार्वेस्ट अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अंर्तगत विकसीत पिकेव्ही मिनी दाल मिल सोबतच शेवई मशीन, गहू प्रकिया मशीन, पल्वरायजर, कांडप यंत्र, चक्की इ.विविध यंत्रे एकाच छताखाली आणुन कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी जि. अहमदनगर येथे कृषि प्रक्रिया केंद्राची स्थापना नुकतीच करण्यात आली.

याप्रसंगी पोस्ट हार्वेस्ट अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉ. पं. दे.कृ. वि. अकोलाचे संशोधन अभियंता तथा विभाग प्रमुख, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख, डॉ. प्रदिप बोरकर अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. तर श्री पंडित लोणारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पंडित लोणारे यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये अतिशय नाविन्यपुर्ण उपक्रमाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभारव्यक्त केले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मजूरांचा तुटवडा, वाढलेली मजूरी यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी तोट्यात येतो, म्हणून शासनाच्या यांत्रिकीकरणासाठीच्या योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

दाल मिलसारखा कृषि प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाकडुन योजना उप़लब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेततळे, कांदा चाळ तसेच उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेबाबत त्यांनी माहीती दिली. शेतकरी माल पिकवतो पण त्यांनी प्रक्रिया, पॅकींग व विपणन सुद्धा शिकावे. जेनेकरून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com