Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

नवापूर जिल्ह्यातील देशी तूरडाळीला ‘जीआय’ मिळाले

मागील वर्षी तूरडाळीने प्रति किलो शंभर रूपये ही किंमतही ओलांडली होती. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीची किंमत काहीशी गडगडली. या दरम्यानच महाराष्ट्रातील एका भागातील तूरडाळीने आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची ती डाळ ओळख आहे.

स्थानिक पातळीवर नवापूर तालुक्यामध्ये उत्पादित होणारी तूर ही 'देशी तूर' या नावाने प्रसिद्ध आहे. या क्षेत्रामध्ये डोंगराळ भाग आणि आदिवासी शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे व भात आणि तूर हे येथील लोकांच्या रोजच्या आहारातील मुख्य घटक आहेत. येथील आदिवासी रसायनांचा वापर न पारंपरिक पद्धतीने तूर पिकवतात.

नवापूर तालुक्यात नैसर्गिक शीतलता कायम राखली जाते कारण येथील सरासरी तापमान २६ ते ३८ अंश सेल्सिअस तर सरासरी पर्जन्यमान ११६५ ते १२६५ मिमी आहे. याच नैसर्गिक वातावरणामुळे येथील तूर डाळीला विशिष्ट असा सोनेरी पांढरा रंग व सुगंधही प्राप्त होतो, तसेच गुणवत्ताही वाढते.

नवापूर तालुक्यातील बहुतांश भाग मध्यम काळ्या रंगाच्या मातीने समृद्ध असल्यामुळे येथे घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळते. त्यामुळे पिकाच्या पोषक वाढीला मदत होते आणि डाळीतील अमिनो अॅसिडसचे प्रमाण वाढविण्यासही मदत होते. नवापूर येथील शेतकऱ्यांचा या पिकातील उत्पादन खर्चही कमी असतो. त्याच बरोबर जात्यावर दळल्यामुळे या डाळीला अन्य डाळींच्या तुलनेत वेगळाच सुगंध प्राप्त होतो.

या डाळीतील फोलिक अॅसिड हा घटक स्त्रियांसाठी महत्त्वाचा पोषकघटक असतो जो गर्भाच्या विकासासाठी त्याची आवश्यकता असते. या तूरडाळीला जीआय मिळविण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. या तूरीला जीआय मिळाल्यामुळे जगात दर्जेदार उत्पादन म्हणून पुढे येईल.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com